कन्हेरगाव, ता. 7 जुलै (प्रतिनिधी) – कन्हेरगाव परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करून घबराट निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याने अनेक शेळ्या, गायी आणि वासरांवर हल्ला करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
या पार्श्वभूमीवर काल (रविवार) दुपारी दोन वाजता वनविभागाचे वनरक्षक शुभम धायतडक व अभिषेक कापसे, युवा नेते ऋतुराज तानाजी काळे-पाटील, तसेच कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी गावात भेट दिली. त्यांनी दादासाहेब काळे, रामलिंग केदार आणि दत्तात्रय सरडे यांच्या घरी जाऊन नुकसानीची पाहणी केली.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वासरांची प्रत्यक्ष पाहणी करून, भविष्यातील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. वनविभागाने सतर्कतेने पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
यावेळी ऋतुराज काळे-पाटील, दत्तात्रय सरडे, किरण दत्तात्रय सरडे, अनिकेत रामलिंग केदार, सुधीर डोके, आपा दिवटे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.