माढा तालुक्यातील अकोले खुर्द गावातील चिंतामण वस्ती येथे शनिवार, दिनांक १९ जुलै रोजी रात्री बिबट्याने एका शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा हल्ला रात्री सुमारे ९ वाजता घडला. बिबट्याच्या अचानक हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाचे अधिकारी रात्री १० वाजता घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “वरून लेखी परवानगी आल्याशिवाय बिबट्याला पकडण्याचा किंवा ठार करण्याचा अधिकार आम्हाला नाही.”
गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ अॅड. रणजित पाटील यांनी या प्रकारात सक्रिय सहभाग घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. त्यांनी तात्काळ पिंजरा लावण्याची, रात्रीची गस्त वाढवण्याची आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर टीका करत सांगितले की,
“प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं.”
या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वीच शेजारील कन्हेरगावा मध्ये बिबट्याचा वावर पाहण्यात आला होता. तेथील पिंजरे लावूनही बिबट्या सापडला नव्हता. त्यामुळे तोच बिबट्या अकोले खुर्द परिसरात स्थलांतरित झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अकोले खुर्द हे शेतीप्रधान गाव असून येथे मोठी शाळा आणि कॉलेजही आहे. त्यामुळे दररोज अनेक विद्यार्थी चालत प्रवास करतात. बिबट्याचा मुक्त संचार विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावासाठी धोकादायक ठरू शकतो.
या पार्श्वभूमीवर अॅड. रणजित पाटील यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
“कोणीही एकट्यानं फिरू नये, रात्रीच्या वेळेस अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, तसेच लहान मुलं, शेळ्या आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी,” असा सल्ला त्यांनी दिला आहे.