Heavy Rain Ujani Dam: काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने करमाळा तालुक्याला झोडपून काढले असून कोर्टी या गावी तर ढगफुटीसदृश पाऊस (Cloudburst Rain) झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यातच सध्या पुणे व सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पंढरपूरवर पुराची टांगती तलवार दिसू लागली असून आज सकाळी नऊ वाजता उजनी धरणातून (Ujani Dam) एक लाख क्युसेक विसर्गाने भीमा नदीत तर वीरधरणातून 17111 क्युसेक विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या उजनी धरण 109% पेक्षा जास्त भरले असून धरणाकडे 80 हजार विसर्गा ने पाणी येत आहे. त्यातच आज पुणे परिसरात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचे अंदाज हवामान खात्याने दिल्याने खबरदारी म्हणून उजनी धरणातून एक लाख क्युसेक विसर्गने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
सातारा परिसरातल्या पावसामुळे वीर धरण ही तुडुंब भरल्याने येथून 17,111क्युसेक विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. नीरा नरसिंगपूर येथे भीमा आणि निरेचा संगम होत असल्याने हे सर्व पाणी एकत्रित पुन्हा भीमा नदीत मिसळत असते. यामुळे पुन्हा एकदा पंढरपुर वर पुराची टांगती तलवार लटकत आहे.
काल रात्री दोन वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने संपूर्ण गावात पाणीच पाणी झाले आहे. कोर्टीच्या परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने कोर्टीचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. या मुसळधार पावसात गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट ऑफिस कार्यालयासह अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय उभ्या पिकात सर्व पाणीच पाणी झाल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तातडीने गावात जाऊन नुकसानीच्या पाहणीला सुरुवात केली आहे. दरम्यान करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज सकाळी या नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.
Solapur Rain: सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, गटाराचे पाणी घरात शिरले
सोलापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल होताना दिसत आहेत. सोलापुरातील सैफुल,स्वामी विवेकानंद नगर भागातील नागरिकांच्या घरात गटाराचे पाणी शिरले आहे. ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे सोलापूरकरांचे जनजीवन झाले विस्कळीत झाले आहे. या सर्व प्रकारामुळे सोलापूर महापालिकेचा नालेसफाईचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
Marathwada Rain: मराठवाड्यात मुसळधार पाऊस
मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 32 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 15 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील 15 , लातूर 4, धाराशिव 7, परभणी 4 आणि हिंगोली जिल्ह्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद.
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. बेरुळा पेरजाबाद गावांच्या शिवारात पावसाने थैमान घातले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग चौथ्या दिवशी सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील बेरूळा, पेरजाबाद अंजनवाडी या गावांच्या शिवारामध्ये हा जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे या भागातील ओढ्यांना पूर आलेला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. आज सलग दुसऱ्या सुद्धा बेरूळा या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. काल सुद्धा गावाच्या शिवारात असलेल्या ओढ्याचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे संपर्क तुटला होता. आज पहाटे जोरदार झालेल्या पावसामुळे पुन्हा बेरुळा या गावचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. बेरुळा गावातील नागरिकांना गावाच्या बाहेर येण्यासाठी आता कोणताही पर्याय नाही. जोपर्यंत रस्त्यावरील पाणी कमी होत नाही तोपर्यंत नागरिकांना घराच्या बाहेर येणे सुद्धा शक्य नाही.