Dattatraya Gade Arrest : अथक प्रयत्न केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात आला. आणि रात्रीच गाडीत बसवून त्याला पुण्याच्या दिशेला आणलं गेलं. सध्या तो लष्कर पोलिसांच्या कोठडीत आहे. पहाटेच ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अकरा वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
Vishal Patil | Updated on: Feb 28, 2025 | 09:50 AM
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरुरमधील गुनाट गावात ऊसाच्या शेतात पुणे पोलिसांकडून गाडेची धरपकड करण्यात आली. सध्या तो लष्कर पोलिसांच्या कोठडीत आहे. पहाटेच ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अकरा वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. त्यादिवसापासू फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला. ७२ तासांच्या आत अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरुरमधील गुनाट गावातील ऊसाच्या शेतातून अटक करत आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. रात्रीच्या अंधारात त्याला शोधण्यास पोलिसांना अडथळा येत होता. अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांना तो ऊसाच्या शेतात लपलेला आढळला. शेवटी अथक प्रयत्न केल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला. आणि रात्रीच गाडीत बसवून त्याला पुण्याच्या दिशेला आणलं गेलं. सध्या तो लष्कर पोलिसांच्या कोठडीत आहे. पहाटेच ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अकरा वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांकडून तब्बल तेरा पथके कामाला लागली होती. आरोपीचा सुगावा लागल्यानंतर गुनाट गावात पोलिसांचा मोठा फाैजफाटा दाखल झाला होता. गेले तीन दिवस ज्या आरोपीला पकडण्यासाठी समाजातील सर्वच घटकांकडून पोलिसांवर दबाव आणला जात होता त्याला अखेर बेड्या पडल्या. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या अटकेनंतर मंगळवारी घडलेल्या घटनेचे गूढ उकलण्यास आता पोलिसांना मदत होणार आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन बलात्काराच्या घटनेचा उलगडा झाला खरा, पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. आरोपीने या पूर्वीही त्याच आगारात अशाप्रकारचे कांड केले आहेत का? आरोपी नेमका त्याच एसटीमध्ये महिलेला कसा घेऊन गेला? महिला त्याच्यासोबत जायला तयार होण्यामागे त्यांच्यात नेमकं काय संभाषण झालं? अशा बऱ्याच गोष्टींचा आता खुलासा होणार आहे. दरम्यान, कायद्याने आरोपीस नेमकी काय शिक्षा होणार, आणि किती जलद या घटनेचा निकाल लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.