India GDP Rate : भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण; जीडीपी अवघा ६.७ टक्क्यांवर, गेल्या पाच तिमाहीतला सर्वात कमी दर


India GDP grows by 6.7 percent in first quarter 2023: भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा म्हणजेच जीडीपी दर गेल्या पाच तिमाहींमध्ये सर्वात कमी आहे. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीतला जीडीपीचा दर ६.७ टक्के इतका घसरला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत भारताच्या जीडीपीचा दर ८.२ टक्के इतका होता. शासकीय आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे कृषी क्षेत्राची खराब कामगिरी. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील बहुतांश भागात कृषी क्षेताला मोठा फटका बसला आहे. कृषी उत्पादन इतकं कमी झालं की त्याचा थेट जीडीपीवर परिणाम झाला आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय की भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या जीडीपीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.

Advertisement

भारताच्या जीडीपीची घसरण होत असली तर आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती चीनपेक्षा बरी आहे. कारण या तिमाहीत चीनचा जीडीपी ४.७ टक्के इतका होता. गेल्या वर्षी चीनचा याच तिमाहीमधला जीडीपी ३.७ टक्के होता. त्यामुळे चीनने यंदा गेल्या वर्षीपेक्षा बरी कामगिरी केल्याचं दिसून येत आहे.

जीडीपी म्हणजे काय?

‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) म्हणजेच जीडीपी. हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचं एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असते तेव्हा जीडीपीचा वापर केला जातो. तसेच देशांतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन किती वाढले, हे मोजण्यासाठी देखील जीडीपीच्या दराचा वापर होतो. एखाद्या देशाचा जीडीपी हा त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादन (Production), राष्ट्रीय उत्पन्न (Income) किंवा राष्ट्रीय खर्चावरून (Expenditure) ठरवता येतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »