दिल्ली – सोमवारी पहाटे दिल्लीत झालेल्या ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानी हादरली. हा भूकंप २००७ मध्ये झालेल्या ४.६ तीव्रतेच्या भूकंपानंतरचा सर्वात मोठा धक्का असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने स्पष्ट केले आहे.
Harshal Waghmare | Updated on: Feb 18, 2025 | 04:15 PM
‘शॅलो’ भूकंपामुळे अधिक तीव्र धक्का
हा भूकंप फक्त ५ किलोमीटर खोलीवर झाल्यामुळे तो अधिक तीव्र जाणवला. नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरातही लोकांना भूकंपाच्या हादऱ्यांचा अनुभव आला. भूकंपाच्या वेळी काही सेकंदांसाठी जमीन हादरल्यामुळे अनेक नागरिक घाबरले आणि घराबाहेर पडले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे संचालक डॉ. ओ. पी. मिश्र यांनी सांगितले की, “२००७ साली झालेला ४.६ तीव्रतेचा भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला होता, त्यामुळे त्याचा प्रभाव तुलनेने कमी जाणवला. परंतु, यंदाचा भूकंप केवळ ५ किलोमीटर खोलीवर असल्याने तो अधिक तीव्र वाटला.”
दिल्लीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता कमी
संस्थेच्या अभ्यासानुसार, १९९३ ते २०२५ या काळात ५० किलोमीटरच्या परिसरात एकूण ४४६ भूकंप झाले असून त्यांची तीव्रता १.१ ते ४.६ रिश्टर स्केलपर्यंत होती. २००७ साली ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता, जो यंदाच्या भूकंपाच्या केंद्रस्थानापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर होता.
दिल्लीच्या भूगर्भाखाली अनेक जलसाठे, नद्या आणि प्रवाह आहेत. हजारो वर्षांपासून भूमिगत खडकांमध्ये होत असलेल्या हालचालींमुळे भूगर्भात फ्रॅक्चर्स तयार होतात आणि त्यामुळे अशा भूकंपांचे प्रमाण दिसून येते. मात्र, दिल्ली आणि आसपासच्या भागात ६ रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होण्याची शक्यता फार कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील इमारतींची मजबुती महत्त्वाची
या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवित अथवा मालमत्तेची हानी झालेली नाही. मात्र, मिश्र यांनी सांगितले की, “नवीन इमारती भूकंपरोधक निकषांनुसार बांधणे आणि जुन्या इमारती योग्य प्रकारे बळकट करणे महत्त्वाचे आहे. अशा उपाययोजनांमुळे भविष्यात मोठ्या भूकंपांमध्येही सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.”
दिल्लीसारख्या मोठ्या महानगरात यापुढेही अशा ‘शॅलो’ भूकंपांची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सुरक्षित वास्तुविशारद आणि बांधकाम पद्धतींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.