FASTags KYC: 31 जानेवारी आधी केवायसी न केल्यास तुमच्या कारचा फास्टॅग होणार बंद; अपडेटसाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स…


आता तंत्रज्ञानात रोजरोज बदल होत आहे. टोल नाक्यावरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टटॅग हे तंत्रज्ञान आले. त्यातही अनेक बदल होत आहे. मात्र, अनेक वाहनचालकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याचे व वेगवेगळ्या वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरत असल्याचे आढळून आले होते. त्यातील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आता फास्टटॅग संदर्भात ही नवीन अपडेट समोर आली आहे.

VISHAL PATIL | Updated on: Jan 17, 2024 | 07:20 AM

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024:  फास्टटॅगविषयी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, 31 जानेवारीनंतर काही फास्टटॅग रद्द करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून तुम्ही टोल नाक्यावर टोल भरु शकत नाही. वाहनधारकांना एक वाहन, एक फास्टटॅगचा वापर करावा लागणार आहे. बँकांच्या माध्यमातून यापूर्वी घेतलेले फास्टटॅग दूर करावे लागतील, असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याविषयीच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आणि घोटाळे उघडकीस आल्यानंतर एनएचएआयने हा निर्णय घेतला आहे. तर ग्राहकांना नवीन घेतलेल्या फास्टटॅगसाठी केवायसी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल?

 • तुम्ही केवायसी प्रक्रिया बँकेत जाऊन किंवा  IHMCL च्या वेबसाइटवरून पूर्ण करू शकता.
 • ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला  https://fastag.ihmcl.com या साइटला भेट द्यावी लागेल.
 • त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाकून लॉग इन करा.
 • आता  My Profile या पर्यायावर क्लिक करा.
 • पुढे केवायसी स्टेट्स पर्यायावर जा. त्यानंतर केवायसी टॅबवर क्लिक करून  Customer Type निवडा.
 • त्यानंतर मागितलेली माहिती भरा. तसेच, आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फास्टॅग अपडेट होईल.

तुम्ही फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेत जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. फास्टॅग केवायसी अपडेट फॉर्म व कागदपत्रे जमा केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास 7 दिवस लागतात.

Advertisement

फास्टॅग केवायसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

 • ड्राइव्हिंग लायसन्स
 • पासपोर्ट
 • मतदार ओळखपत्र
 • पॅन
 • आधार 
 • वाहन नोंदणी (Registration Certificate – RC) प्रमाणपत्र

तसेच, केवायसी अपडेटमुळे फास्टॅग वॉलेटमध्ये असलेल्या पैशांच्या मर्यादेवर देखील परिणाम होईल. केवायसी पूर्ण नसल्यास फास्टॅग वॉलेटमध्ये महिन्याला 10 हजार रुपये व वर्षाला 1 लाख रुपयेच ठेवता येत असे. मात्र, आता केवायसीमुळे फास्टॅग वॉलेटमध्ये कोणत्याही कालावधीत 1 लाख रुपये ठेवता येतील.

विना फास्टटॅग वाहनांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावा लागणार आहे. एनएचएआयने काही शंका असल्यास नजीकच्या टोल नाक्यावर याविषयीची माहिती घेण्याचा अथवा बँकांच्या टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे वाहनधारकांना आवाहन केले आहे. टोल नाक्यावर कुठल्याही अचडण, मनस्ताप टाळण्यासाठी वाहनधारकांना त्यांच्या आताच घेतलेल्या फास्टटॅगचे केवायसी करणे पण अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी अपडेट नसेल तर त्यांना फास्टटॅगचा वापर करता येणार नाही. त्यांचा फास्टटॅग आयडी अपडेट होणार नाही.

एनएचआयने का उचलले हे पाऊल

NHAI ने हे पाऊल आरबीआयच्या आदेशानंतर उचलले. एकाच वाहनासाठी अनेक फास्टटॅग विक्री केल्याचे लक्षात आले. तसेच विना केवायसी अनेक फास्टटॅग बाजारात आणल्याचा ठपका केंद्रीय बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ठेवला होता. त्यामुळेच आता एक वाहन, एक फास्टटॅग असे निर्देश एनएचआयएने दिले आहेत. त्यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टटॅगचा वापर आणि एका खास वाहनासाठी अनेक फास्टटॅगचा वापर बंद करण्यात येणार आहे. असे सर्व फास्टटॅग आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता मनस्ताप टाळण्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्या फास्टटॅगची केवायसी करुन घ्यावी. तरच त्यांचे फास्टटॅग सक्रिय राहणार आहे. याविषयीचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे टोल प्लाझावर त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार नाही.

8 कोटी वाहन चालक करतात वापर

देशभरात 8 कोटी वाहन चालक फास्टटॅगचा वापर करतात. या नवीन इलेक्ट्रिक कर प्रणालीमुळे, कर संकलानाचा वेग तर वाढलाच आहे. पण त्यात सूसुत्रता पण आली आहे. पण त्यातही काही पळवाटा आणि घडबड होत असल्याची शंका आल्यानंतर आता नवीन निर्देश देण्यात आले आहे. काही दिवसांनी फास्टटॅगऐवजी वाहन क्रमांकाआधारेच कर संकलनाचे तंत्रज्ञान आणण्याचा मनोदय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी बोलून दाखवला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »