पुढील काही महिन्यात भारतात लोकसभा निवडणुका संपन्न होणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे, तर भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी पूर्ण जोर लावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी जनतेकडून अभिप्राय मागितला आहे. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये ‘जन मन सर्व्हे’ या उपक्रमाअंतर्गत भारताने मागच्या दशकभरात कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती साधली, याबद्दलचा अभिप्राय मागितला आहे.
ज्याद्वारे त्यांना भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील प्रगती जाणून घ्यायची आहे.
नमो एपवर #JanManSurvey च्या माध्यमातून तुमचा फीडबॅक थेट माझ्याशी शेअर करा, असे पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आहे.
याआधीही पीएम मोदींनी भारताच्या विकासाबाबत जनतेकडून त्यांची मते मागवली होती. त्यांनी आपल्या खासदारांच्या कामावरदेखील प्रतिक्रिया मागितल्या होत्या. याशिवाय लोकांना त्यांच्या भागातील सर्वात लोकप्रिय स्थानिक नेत्याबद्दलही सांगण्यास सांगितले होते.
तीन राज्यांतील नेत्रदीपक विजयानंतर भाजपचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे आता पक्षाला लोकसभा निवडणुकीत कुठलीही चुकी करायची नाही. आता भाजप विजयाची हॅट्रिक मारणार की, इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे येत्या काही दिवसात कळेल…